कलंदर: दिन दिन दिवाळे…

उत्तम पिंगळे

कामगार दिनाविषयी प्राध्यापक विसरभोळे सांगू लागले, 1 मे ला कामगार दिवस जरी असला तरी त्याची पूर्वपीठिका समजून घेणे महत्त्वाचे ठरते.औद्योगिक क्रांतीने यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागल्यामुळे ते प्रचंड प्रमाणात वाढले. त्या प्रमाणात मालक वर्गाचा फायदा प्रचंड वाढू लागला. मालक वर्ग मग नोकरांस राबराब राबवून कमी पगारावर त्यांना कामावर ठेवू लागला. कामगारांना याची जाणीव होताच हळूहळू ते एकत्र झाले व 19व्या शतकाच्या अखेरीस 1 मे हा कामगार दिवस म्हणून बऱ्याच देशात पाळला गेला. भारतात तो पहिल्यांदा पाळला जाण्यासाठी 20 वे शतक उजाडावे लागले.

कामगारांसाठी मग अनेक कायदे आले जसे ओव्हरटाइम, भरपगारी रजा, औषधोपचार, जेवणाची सोय इ. कम्युनिस्ट पक्षाने पहिल्यापासूनच कामगारांना सर्वत्र समर्थन देऊ केले होते. पुढे पुढे त्याची प्रचिती युनियनबाजीमध्ये झाली. मुंबईतील गिरणी संप सर्वांना ठाऊक आहे. दत्ता सामंतप्रणीत युनियनच्या पाठोपाठ सुमारे अडीच लाख गिरणी कामगार गेले व जानेवारी 1982 ला सर्वात मोठा संप केला. त्यानंतर बहुतेक सर्वच गिरण्या हळूहळू बंद झाल्या.

यापुढे आता सर्वत्र कंत्राटी पद्धत अवलंबलेली जात आहे. कंपनी फक्‍त मुख्य काम, यामध्ये उत्पादन करणे, त्यांचे मार्केटिंग, त्यांचे आरएनडी एवढेच पाहत असून बाकी सर्व कंत्राटी पद्धतीने दिले जात आहे.तसेच मुबलक कामगार वर्ग उपलब्ध असल्याने मालक वर्गाचीच चलती आहे. तू नाही तर दुसरे शेकडो पडलेले आहेत. युनियन असली तरी एका छोट्या क्षमतेनंतर काहीही विशेष फरक करू शकत नाही. कामगार वर्गाची अवस्था सुधारण्याकरिता आधी रोजगार निर्माण होणे आवश्‍यक आहे आणि म्हणूनच नवीन तंत्रज्ञांनी नोकरी न करता नवीन व्यवसाय-उद्योग निर्माण केले पाहिजेत. जेणेकरून नवनवीन रोजगाराच्या संधी तरुणांना उपलब्ध होतील.

मध्यंतरी प्रधानमंत्रींनी पकोडा बनवणे हा रोजगार सांगितला होता. लोकांनी याचा शब्दश: अर्थ घेतला; पण एक लक्षात ठेवा तुम्ही रोज ज्या वडापाववाल्याकडून वडापाव घेता तो तुमच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत असतो पण तो दाखवत नाही एवढेच. कितीतरी सरकारी उद्योग अकार्यक्षम व युनियनबाजीत अडकले असल्यामुळे ते पांढरे हत्ती ठरलेले आहेत. महानगर टेलिफोन, दूरसंचार व अगदी आता पोस्ट ऑफिसही यांनी सुधारायचेच नाही असे ठरवले दिसते. तेथील कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार असल्यामुळे हे सर्व उद्योगात आतबट्यात गेलेले आहेत. एअर इंडिया नावाचा पांढरा हत्ती सरकार अजूनही पोसत आहे तोच खासगी असता तर? बघा जेटची काय अवस्था झाली आहे ती.

तशातच आरक्षण वगैरे मुद्दे काढून राजकारण केले जात आहे. नसलेल्या नोकऱ्यांसाठी आंदोलने होत आहेत. रोजगार निर्माण करण्यास चालना द्यावी असे कुणालाच वाटत नाही. शेतीबरोबर त्याला आवश्‍यक असणारे पूरक उद्योग निर्माण केले तसेच शेतीचे उत्पादन वाढवले तर स्थानिक लोकांना तिथल्या तेथे रोजगार निर्माण होऊ शकतो. म्हणूनच नवीन रोजगारनिर्मिती होणार नाही तोपर्यंत श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी खूप वेगाने वाढत जाईल. शेवटी रोजगार नसेल तर बेकारी वाढेल व जे प्रचंड सामाजिक वादळ निर्माण होईल ते कोणतेच सरकार थोपवू शकणार नाही. म्हणूनच सर्वांगीण उद्योग वाढीस लागण्यास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरेल. नाहीतर कामगार दिन फक्‍त कागदावरच राहील व कामगार दिवसेंदिवस दीन होत राहील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.