एक रुपयात विवाहाचे सामाजिक दायित्व

देखणे आणि काटेकोर नियोजन

स्वागत कक्ष, चौकशी, निवासव्यवस्था, स्टेजव्यवस्था, सजावट, भोजन, वाढप, वीजव्यवस्था, वातावरण सुगंधीत करणारा अत्तराचा स्प्रे, पाणी व्यवस्था, स्वच्छता, भेटवस्तू, अन्य धर्मीय विवाह, मिरवणूक, सुरक्षा, फोटो प्रसिद्धी, बैठक, सत्कार समिती, अशा सुमारे पंचवीस समित्या विवाह सोहळ्यावर लक्ष ठेवून असतात. उद्योग समूहातील कर्मचारी आणि कामगार प्रतिनिधी मिळून या नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात.

बोलके अभिप्राय

आतापर्यंत या सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या अनेक वधूवरांच्या पालकांनी सुंदर लेखी अभिप्राय नोंदविले आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांचे विवाह या सोहळ्यात होतात ते भविष्यात आपल्या नात्यातील विवाह येथे घडवून आणण्यासाठी आग्रही असतात. अशाप्रकारे मालपाणी पॅटर्नवर विश्‍वासाची मोहोर उमटवितात. आमच्या मुलाबाळांची इतकी हौसमौज तर आम्हीही केली नसती. हजारो लोकांच्या साक्षीने झालेलं लग्न म्हणजे जणू स्वप्नच आहे, अशा प्रतिक्रिया बोलक्‍या ठरतात.

संगमनेर –दोन दशकांची सामजिक दायित्वाची परंपरा लाभलेल्या मालपाणी मालपाणी उद्योग समूहाच्या सर्वधर्मिय भव्य विवाह सोहळ्यामध्ये मंगळवारी अक्षय्य तृतीयेला (7 मे) पन्नास दांपत्य विवाहबध्द होत आहेत. आजपर्यंत 1 हजार 200 परिवार या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सुरू असलेला हा विवाह सोहळा संगमनेरच्या परंपरेचा एक भाग बनला आहे.

मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यु ओंकारनाथ मालपाणी आणि माधवलाल मालपाणी यांच्या संकल्पनेतून 21 वर्षांपूर्वी उद्योग समूहातील कामगारांसाठी सुरू झालेला हा सोहळा आज संगमनेरचे भूषण ठरला. विवाह समारंभात होणारी हजारो रुपयांची उधळपट्टी, त्यामुळे वधु-वराच्या परिवारावर होणारा कर्जाचा बोजा या बाबी लक्षात घेऊन सुरु झालेली सोहळ्याची व्याप्ती हळूहळू वाढत गेली आणि समाजातील वंचित घटकासोबतच आता उच्चशिक्षित वधु-वरदेखील यात सहभागी होत आहेत. केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात होणारा हा विवाह सोहळा राज्यात कौतुकाचा विषय ठरतोय. यंदाही या सोहळ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला असून, या सोहळ्यात 44 हिंदू, 1 मुस्लीम आणि 5 बौद्ध अशा सर्वधर्मीय वधूवरांचे विवाह त्या-त्या धार्मिक प्रथेनुसार लावण्यात येणार आहेत. सोहळ्यासाठी जनसमुदायाच्या साक्षीने नवदांपत्य वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणार आहेत.

सजविलेला मंडप, वधुवर निवास व्यवस्था, आहेर म्हणून द्यावयाच्या वस्तू, वधुवरांसाठी पोषाख, आणि संसारोपयोगी साहित्याची भेट मालपाणी परिवाराकडून देण्यात येते. यामुळे मालपाणी पॅटर्न’ म्हणून हा विवाह सोहळा ओळखला जाऊ लागला. विवाह सोहळ्यात त्या-त्या धर्माच्या प्रथेप्रमाणे विवाह लावण्यात येतात. समाजाच्या सर्व स्तरातील सुमारे पंधरा-वीस हजारांचा जनसमुदाय या कार्यक्रमाचा साक्षीदार असतो. मंत्रीगण, आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित असतात. संसाराची सुरुवात करतानाच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी जोडप्याने घ्यावी, यासाठी प्रत्येक जोडप्यास एक रोप जोपासण्यासाठी भेट दिले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.