कामाव्यतिरिक्त अनिल देशमुखांना भेटलो नाही : सचिन वाझे

मुंबई – अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना निश्‍चित कधी भेटलो, याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही. मात्र, आपण कामाव्यतिरिक्त कधीही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलेलो नाही, असे सचिन वाझे यांनी उलटतपासणीत सांगितले.

राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगासमोर आजही सचिन वाझे यांची उलटतपासणी करण्यात आली. या उलट तपासणीत सचिन वाझे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सचिन वाझे यांची पुढील उलटतपासणी आता 13 डिसेंबरला घेण्याचे आयोगाने निश्‍चित केले आहे.

चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगाच्या सुनावणीस आज पावणे एकच्या सुमारास सुरुवात झाली. सचिन वाझे यांना देशमुख यांच्या वकील अनिता यांनी प्रश्न विचारले. पण सचिन वाझे यांनी उत्तर देण्याआधीच अनिल देशमुख यांच्या दुसऱ्या एका वकिलाने मध्यस्थी करत सचिन वाझे आणि परमवीर सिंग या दोघांची दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आलेले वृत्तांकनावर नाराजी व्यक्त केली.

मात्र याच वेळेस स्वतः सचिन वाझे यांनीच नाराजीला उत्तर देत प्रसारमाध्यम त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि जे घडले ते त्यांनी लिहिले, असे सांगितले. तर न्यायालयीन चौकशी आयोगाचे वरिष्ठ विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मध्यस्थी करत ही खुली चौकशी आहे यात सर्वांना काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. जे घडले ते सांगितले गेले, ते लिहिले गेले, असा युक्तिवाद केला. यानंतर हा अर्ज मागे घेण्यात आला.

दरम्यान, परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राद्वारे केलेल्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांची हे आयोग समांतर चौकशी करत आहे. ही चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदिवाल यांच्यामार्फत सुरू आहे. आयोगातर्फे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलेल्या अनिल देशमुखांना सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी हजर करण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.