तालिबानकडून 100 माजी लष्करी अधिकाऱ्यांचे अपहरण

न्यूयॉर्क  – अफगाणिस्तानमधील तब्बल 100 माजी लष्करी अधिकाऱ्यांची तालिबानकडून एकतर हत्या करण्यात आली आहे किंवा या अधिकाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे, असा दावा अमेरिकेतील एका मानवी हक्क विषयक गटाने केला आहे.

तालिबानने ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी, गुप्तचर विभागीतील कर्मचारी आणि निमलष्करी सेवेतील सैनिक अशा जवळ जवळ 100 जणांचे अपहरण करण्यात आले आहे. यापैकी काही जणांची हत्या देखील करण्यात आली आहे, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

एकूण 67 मुलाखतींच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये अपहरण किंवा हत्या झालेल्या अधिकाऱ्यांचे नातेवाईक, मित्र अशा 41 साक्षीदारांच्या मुलाखती आहेत. यामध्ये काही तालिबानच्या म्होरक्‍यांच्याही मुलाखती आहेत. यातील काही साक्षीदारांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.

गझनी, हेमंड, कंदहार आणि कुंडुझ या प्रांतात यापैकी बहुसंख्य घटना घडलेल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र खोस्त, पख्तिया, पख्तिका आणि अन्य प्रांतातही अशाच घटना घडल्या असल्याचा दावा मानवी हक्कविषयक गटाने केला आहे.

तालिबानच्या प्रवक्‍त्याने या अहवालातील सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पूर्वीच्या सरकारमधील सर्व लष्करी अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना माफ केले गेले आहे. त्यांना सामान्य जीवन जगू दिले जात आहे, असे या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. तालिबानचे सरकार पूर्वीपेक्षा सर्व समावेशक आणि सहिष्णू असेल असा दावा तालिबानच्यावतीने पूर्वी करण्यात आला होता. मात्र यात काहीही अर्थ नाही हे या अहवालातून स्पष्ट होते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.