मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संभाजीनगर (chhatrpati sambhajinagar) येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेला जाणार असल्याचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटल होत. त्यानंतर संभाजीनगरमध्ये शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली यादरम्यान शिंदे यांनी राऊत नाही आले का ? असा सवाल देखील विचारला. मुख्यमंत्र्यांचा या प्रश्नावर आता खुद्द संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे विविध गोष्टींबाबत माहिती देत होते. अचानक काहीतरी आठवून ते म्हणाले,तुमचे ते.. राऊत नाही आले का ? इतक्यात पत्रकारांमध्ये हशा पिकाला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले,विकास राऊत म्हणतोय मी.मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रिये नंतर संजय राऊत यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे.
“मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनात थोडी धाकधूक होती. खरोखरच येणार नाहीत ना? शेवटी भुताटकी आहे. येऊन कोणाच्या मानेवरती बसणार नाहीत ना? पण, पत्रकार परिषद झाली. संभाजीनगर आणि मराठवाड्याला फक्त घोषणाच मिळाल्या” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
संजय राऊत पुढे म्हणाले,”मी पत्रकार परिषदेला येत असल्याने निर्बंध आणण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला फोटो असलेले पास देण्यात येत नाहीत. मात्र, मी येत असल्यानं फोटोचे पास देण्यात आले. एवढी भीती मनात बाळगू नये”