धुळे – साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु असताना दोन गटात हाणामारी झाली. भाजप आणि विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत भाजपचा एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणल्याच्या कारणावरून ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना प्रभाग क्रमाक 14 येथे घडली. या घटनेमुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपच्या पदाधिकाऱ्यास मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे कारण विरोधकांनी विचारले. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्याठिकाणी उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यास विरोधकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात भाजपचा पदाधिकारी गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.