नागपूर – ‘मोदींना मी मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक भाजप नेते, कार्यकर्त्यांनी निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राज्यातील विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे भंडारा पोलिसांनी कथित मोदी गावगुंडाला ताब्यात घेतले आहे. भाजप मूळ मुद्याला बगल देण्यासाठी विषयाचा आणि वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.
नाना पटोले म्हणाले, ‘भंडारा पोलिसांनी कथित मोदीला पकडले आहे. लोकांचे बयान घेतले आहे, ज्यांनी तक्रार केली त्यांचेही बयान झाले आहे. भंडारा पोलिसांना मी सांगितले आहे की, याचा तपास करा. तसा गावगुंड नसेल तर माझ्यावर कारवाई करा. हा गावगुंड कोण आहे, याचा भंडारा पोलीस तपास करत आहे. गुंड मोदीचे टोपण नाव मोदी आहे. त्याचे मूळ नाव आणि गाव भंडारा पोलिसांना विचारा, याच गाव गुंडाने माझ्या विरोधात प्रचार केला होता आता लोकांनीच मला ती माहिती दिली आहे, मी काही सभेत बोललो नाही, तर लोकांशी बोलत असताना मोदीला मारण्याबद्दल बोललो होतो, असेही पटोले यांनी सांगितले.
तसेच पंतप्रधानपद हे एका पक्षाचे नसते, ते देशाचे असतात, भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी, वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत आहे. काँग्रेस प्रधानमंत्री पदाचा आदर करते, मी भाषणात बोलत नव्हतो. मी लोकांना हिंमत देण्यासाठी बोलत होतो त्या गावगुंड मोदीबद्दल बोलत होते. असेही पटोले म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधानपदाचा मान घालवणाऱ्या या आंदोलनां विरोधात काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.