ढेबेवाडी – सणबूर, ता. पाटण येथील एकाच कुटुंबातील चौघांचा गुरुवारी (दि. 20) रात्री राहत्या घरात झोपलेल्या स्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे ढेबेवाडी परिसरासह तालुका हादरला आहे. आनंदा पांडुरंग जाधव (वय 75), पत्नी सुनंदा (वय 65), मुलगा संतोष (वय 45, रा. सणबूर) आणि जाधव यांची विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (मूळ रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या चौघांनी आत्महत्या केली की, त्यांच्या मृत्यूमागे काही अन्य कारण आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आनंदा जाधव हे आजारी असल्याने त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना गुरुवारी उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. रुग्णालयातून त्यांना सायंकाळी घरी सोडण्यात आले.
सणबूर येथील त्यांच्या घरी त्यांना रात्री ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. तेथील वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. आनंदा जाधव यांच्यासोबत पत्नी, मुलगा व मुलगी घरी होते.आनंदा जाधव यांचे घर आडबाजूला आहे. विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्याने पुन्हा शुक्रवारी सकाळी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कोणीही फोन उचलत नसल्याने, त्याने शेजारच्या व्यक्तींशी संपर्क करून घरी विचारपूस करायला सांगितले. त्यामुळे गावातील काही लोक विचारपूस करायला जाधव यांच्या घरी गेले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. लोकांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने, लोकांनी दरवाजाची कडी तोडली. त्यांनी आत जाऊन पाहिले असता चार जण अंथरुणावर मृतावस्थेत पडल्याचे दिसले. पोलीस पाटील राजेश सुतार यांनी याबाबतची माहिती ढेबेवाडी पोलिसांना दिली.
पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, सपोनि अभिजित चौधरी, उत्तम भापकर, पोलीस उपनिरीक्षक तलवार, नवनाथ कुंभार, संजय राक्षे, माणिक पाटील, प्रशांत चव्हाण, प्रशांत शेवाळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, गावातील लोकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू केले.
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (फोरेन्सिक लॅब) कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. या चौघांनी आत्महत्या केली की, त्यांचा घातपात झाला, किंवा जनरेटरमुळे गुदमरून मृत्यू झाला, याचा तपास सुरू आहे. चौघांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
गावाकडे शेतात बांधले होते घर
आनंदा जाधव हे निवृत्त माध्यमिक शिक्षक होते. निवृत्तीनंतर ते कुटुंबीयांसह कराडमध्ये रहात होते. कधी तरी गावी आल्यावर काही दिवस राहता यावे, म्हणून त्यांनी गावाबाहेर शेतात पत्र्याचे छोटे घर त्यांनी बांधले होते. त्यांची मुलगी पुष्पलता या वडिलांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी चार दिवसांपासून सणबूर येथेच मुक्कामी होत्या. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मंद्रुळकोळे शाखेतील अधिकारी प्रकाश धस यांच्या पुष्पलता या पत्नी होत.
====================