कार्ला, दि. 2 (वार्ताहर) -नवरात्र उत्सवातील देवीची सातवी माळ व रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने देवीचे दर्शनासाठी पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो भाविक कार्ल्यात दाखल झाले होते. भाविकांच्या वाहनांमुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. तर गडावर भाविकांचा महापूर आल्याचे चित्र पहायला मिळाले.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुण्या-मुंबईसह राज्यभरातील भाविक भक्तांची पहाटेपासूनच गर्दी होऊ लागली होती. त्यामुळे सकाळीच एकवीरादेवी गड भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता; तर दुपारी बारा वाजेपर्यंत गडावर उच्चांकी गर्दी झाली होती.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरबरोबरच भक्तांची गर्दी वाढल्याने कार्ला फाटा ते एकवीरा देवी रस्तावर देखील वाहनांची वाहतुक कोंडी होत होती. कार्ला गडावर गर्दी वाढल्याने पायऱ्यांवर चेंगराचेंगरी होऊ नये, याकरिता भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत होते. तर भाविकांना सुलभतेने दर्शन होण्यासाठी एकवीरा देवस्थान प्रशासन विश्वस्त, पुजारी प्रतिनिधी, ग्रामपंचायत वेहरगाव सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांचे प्रयत्न सुरू होते.
कार्ला गडावर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने 16 पोलीस अधिकारी, 100 पोलीस जवान, आरसीपी, कमांडो व बीडीडीएस यांचे प्रत्येकी एक पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दर्शनासाठी अनेक तासांचा अवधी
तसेच काही भाविक पायऱ्यांवरील गर्दी टाळण्यासाठी थेट डोंगरावरुन पायी वाटेने मंदिराकडे जात होते. ही पायवाट धोकादायक असल्याने भाविकांनी खबरदारी घ्यावी, अनावश्यक धाडस करू नये असे आवाहन करण्यात आले होते. तर एकवीरा गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर गर्दीमुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या रांग लांबच लांब रांगा लागल्याने भक्तांना दर्शनासाठी तासन्तास वेळ लागत होता.