टाकवे बुद्रुक, दि. 2 (वार्ताहर) – येत्या बुधवारी (दि.5) ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईत होणार आहे. याकरिता प्रत्येक शिवसैनिकाने या मेळाव्याला उपस्थित राहण्याकरिता तयारी करत आहे. मात्र, मावळ तालुक्यातील सावले गावातील शोभिनाथ भोईर हा शिवसैनिक शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याकरिता पायी निघाला आहे. मजल-दरमजल करत हा शिवसैनिक दोन दिवसांनी बुधवारी (दि.5) शिवतीर्थावर पोचणार आहे.
दसरा मेळावासाठी दोन्ही गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू केली आहे. बस, कार, रेल्वे जे वाहन मिळेल त्या वाहनांतून वाजत गाजत या अशी साद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपापल्या शिवसैनिकांना केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साद घालीत मावळ तालुक्यातील कडवा शिवसैनिक अनवाणी पायाने सावळा गावातून पायी चालत शिवतीर्थाकडे निघाला आहे. त्यांची वेशभूषा पूर्णपणे भगवी कपडे असून कपाळाला भगवा लावला आहे. जय भवानीचा जयघोष करीत हा शिवसैनिक मार्गक्रमण करत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. त्यांच्या प्रेमापोटीच मी शिवतीर्थापर्यंतचा प्रवास सुरू केला आहे. दसरा मेळाव्यातून मी वर्षभरासाठीचे संचित आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.