इस्लामपूर (प्रतिनिधी) : काळजी घ्या ; आम्ही तुमच्या सोबत आहोत. अशा शब्दांत धीर देत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना रुग्णांना दिलासा दिला. निमित्त होते इस्लामपुरातील प्रकाश हाॅस्पिटलच्या कोविड सेंटरच्या पाहणीचे. शहराचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या प्रकाश हाॅस्पिटलच्या कोविड सेंटर मधील सोयी सुविधा बाबत रुग्णांनी फडणवीस यांच्याकडे सकारात्मक प्रतिसाद नोंदवला.
व्हिडीओ काॅन्फरन्सव्दारे कोविड सेंटर मध्ये उपचार करत असलेले तज्ञ डाॅक्टर व रुग्णांशी संवाद साधत आढावा घेतला. येडेनिपाणी, शिगाव येथील रुग्णांशी संवाद साधताना फडणवीस यांनी तुमची तब्बेत कशी आहे ? रुग्णालयात कधी दाखल झाला. ताप, अशक्तपणा येतो का ? असे प्रश्न विचारले. तुम्ही काळजी घ्या. आम्ही तुमच्या सोबत आहे. असे सांगत रुग्णांचे मनोधैर्य वाढवले. रुग्णांसाठी इथं सर्व स्टाफ, डॉक्टर खूप काळजी घेतात. रोजचा आहार, योगासने यांचे मार्गदर्शन चांगले होते. नियमितपणे सर्व रुग्णांच्या सेवेसाठी इथं सर्वजण तत्पर आहेत. संस्थापक निशिकांत पाटील यांचे विशेष लक्ष असल्याचे रुग्णांनी सांगितले.
डॉ. धैर्यशील पाटील यांनी संवाद साधताना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान फंडातून अत्याधुनिक उपकरणे देण्याची मागणी केली. तसेच राज्य सरकारच्या योजना मध्ये रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. पण त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह होईल पर्यत आणि ते रिपोर्ट हातात येईपर्यंत जाणाऱ्या कालावधी खूप मोठा आहे. यामुळे इतर रुग्णांना बेड उपलब्धता होण्यात तांत्रिक अडचणी येतात याकडे लक्ष वेधले.
याप्रश्नी आपण स्वतः मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू असे सूचित केले. यावेळी प्रकाश हाॅस्पिटलचे संस्थापक निशिकांत पाटील, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील उपस्थित होते. प्रकाश हाॅस्पिटलचे डॉ अभिमन्यू पाटील यांनी विभागातील सोयी सुविधांची माहिती दिली.