किव्ह – रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला अधिक मदत करावी, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी केले आहे. युक्रेनला रणगाडे, विमाने आणि क्षेपणास्त्रांची मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे. रशियाच्या फौजांकडून युक्रेनचे तेलसाठे आणि अन्नधान्याच्या गोदामांना लक्ष्य केले जाते आहे. त्यामुळे आता उर्वरित साठ्यांचे सरकारला लवकरात लवकर वितरण करावे लागणार आहे, असे युक्रेनच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार वेदीम देन्सेंको यांनी म्हटले आहे.
रशियानेही या हल्ल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रशियाच्या क्षेपणास्त्रांनी लिव्ह शहरातील इंधन साठे आणि लष्करी दुरुस्ती डेपोला लक्ष्य केले असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाची चार रॉकेट शनिवारी लिव्ह शहरावर डागण्यात आली. त्यामुळे युक्रेन सरकाने नागरिकांना घरातच थांबण्याचे निर्देश दिले आहेत.
खारकिव्ह येथील युक्रेनच्या आण्विक उर्जा केंद्रावरही रशियाने रॉकेट हल्ला केला आहे. या रॉकेट हल्ल्यामुळे या आण्विक उर्जा प्रकल्पाच्या न्युट्रॉन प्रायोगिक प्रयोगशाळा सुविधा केंद्राला शनिवारी आग लागली होती.
बायडेन यांच्या पोलंड दौऱ्यावेळीच रशियाचा रॉकेट हल्ला
अमेरिकेचे द्यक्ष पोलंडमध्ये असतानाच लिव्ह शहरामध्ये रशियाने रॉकेट हल्ला केला. लिव्ह शहर पोलंडच्या सीमेपासून अवघ्या 45 मैलांवर आहे. लिव्ह शहराच्या इशान्येकडील पहिल्या रॉकेट हल्ल्यापासून लिव्ह शहराच्या अवकाशात काळ्या धुरांचे लोट उठू लागले होते. या रॉकेट हल्ल्यांमध्ये 5 जण जखमी झाल्याचे लिव्ह शहराच्या प्रसासनाने म्हटले आहे. मात्र ही रॉकेट कोणत्या लक्ष्याच्या दिशेने सोडण्यात आली होती, हे स्पष्टच करण्यात आले नाही.