पिंपरी – कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून सापळा रचून खंडणी घेणाऱ्यांना जेरबंद केले. निगडी येथे शनिवारी (दि. 26) रात्री नऊ ते साडेनऊ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.
रोशन संतोष बागुल (वय 22), महिला आरोपी (वय 22, दोघेही रा. सोनजाब, ता. दिंडोरी, जि. नाशिक, सध्या रा. देहूगाव), दुसरी महिला आरोपी (वय 22, रा. हडपसर, पुणे, सध्या रा. देहूगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विन्सेन्ट अलेक्झंडर जोफेस (वय 52, रा. ताम्हाणे वस्ती, मोरे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश तसेच विश्वास नांगरे पाटील हे ओळखीचे आहेत. आम्ही जमिनीचे मॅटर सॉल्व्ह करतो. आम्ही पोलिसांकडून जमिनीची कामे केली आहेत, अशी बतावणी आरोपी रोशन बागुल याने केली. महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स असे लिहिलेले व महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेले बनावट ओळखपत्र तयार करून पोलीस दलाचा सदस्य असल्याचे भासवून सात हजार रुपये खंडणी “गुगल पे’वरून फसवणूक करून स्वीकारले.
असा रचला सापळा…
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून सापळा रचला. फिर्यादीने आरोपी रोशन बागुल याला पैसे घेण्यास फोन करून निगडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. पाचशे रुपयांची चलनातील खरी नोट व त्याखाली पाचशे व दोन हजार रुपयांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा लावून एक लाख रुपयांचे बंडल तयार केले.
आरोपी रोशन बागूल हॉटेलमध्ये आला. त्यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश वेशांतर करून तेथे आले होते. आरोपी रोशन बागूल याने पैसे स्वीकारल्यानंतर त्याला पकडण्यात आले. मात्र त्याचे दोन साथीदार पळून गेले.