न्हावरे – येथील परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू मिळत आहे. कोणाच्या आशिर्वादाने गावठी दारूचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच गावठी दारू बंद करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
लॉकडाऊनमुळे बिअरबार बंद असल्यामुळे गावठी दारूचा धंदा जोरात सुरू आहे. गावठी दारूचा दरही तेजीत आहे. गावठी दारूची एक लिटरची बाटली 70 रुपयांना मिळत आहे. तर एका तांब्याचा भाव 40 रुपये आहे. लॉकडाऊन असूनही संध्याकाळच्या वेळेस तळीराम न्हावरे चौकात आणि आलेगाव फाटा येथे फिरताना दिसत आहेत.
सरपंच ताई तांबे म्हणाले की, गावठी दारू विक्री करणाऱ्यांना ग्रामपंचायतीने वेळोवेळी धंदे बंद करण्यासाठी तंबी दिली. मात्र, सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गावठी दारू विक्रेते दारू विकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे म्हणाले की, पोलिसांवर सध्या लॉकडाऊनच्या काळात कामाचा ताण आहे. तरीही शिरूर पोलीस अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. न्हावरे परिसरातील गावठी दारू धंद्यावरही कारवाई करण्यात येईल. उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई करावी.