बीजिंग – गंभीर इशाऱ्यानंतरही नॅन्सी पेलोसींनी तैवानला भेट दिल्याने चीन प्रचंड संतापला आहे. त्या भेटीला असणारा तीव्र विरोध उघड करण्यासाठी चीनने लक्ष्याधारित लष्करी मोहिमांची तयारी चालवली आहे.
पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अतिशय कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. पेलोसी भेटीमुळे चीन आणि अमेरिका संबंधांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होईल. त्या भेटीने विभागीय शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण होणार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. त्याशिवाय, चीनने तैवानच्या भोवताली लष्करी मोहिमांचे सत्र राबवण्याचे सूतोवाच केले आहे.
त्यापाठोपाठ चीनी लष्कराच्या हालचाली तैवानच्या सामुद्रधुनीत वाढल्याची माहिती मिळत आहे. त्याशिवाय, चीनच्या काही लढाऊ विमानांनी ती सामुद्रधुनी ओलांडल्याचेही सांगण्यात येत आहे.