वॉशिंग्टन – अमेरिका संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या कॅलिफोर्नियातील घरावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. हल्लेखोराने त्यांच्या घरात घुसून पतीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समजते. या हल्ल्यात पॉल पेलोसी जखमी झाले (Nancy Pelosi’s husband attacked at their San Francisco home) असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेवेळी नॅन्सी पेलोसी त्यांच्या कॅलिफोर्नियातील घरी नव्हत्या. त्यांच्या पतीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते लवकर बरे होण्याची आशा डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने तपासाला सुरूवात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला या घटनेनंतर अटक करण्यात आली. या हल्लोखोराची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच, या हल्ल्यामागचे कारणही अद्याप समोर आलेले नाही.
पेलोसींच्या पतीवर झाली शस्त्रक्रिया
पेलोसी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेले पेलोसी यांचे पती पॉल पेलोसी यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्ल्यामुळे पॉल पेलोसी यांच्या कवटीला मार बसला आहे. तसेच त्यांच्या उजव्या हाताला देखील मार बसला आहे, असे पेलोसी यांच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. पॉल पेलोसी यांच्यावर तातडीने करण्यात येत असलेल्या उपचारांबद्दल पेलोसी कुटुंबियांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच हल्ल्याबद्दल समजताच पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचेही आभार मानण्यात येत आहेत, असे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
दरम्यान पेलोसी यांच्या पतीवर झालेला हल्ला निषेधार्ह असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. देशात खूप मोठ्या प्रमाणात द्वेष आणि हिंसाचार असल्याचेही बायडेन यांनी म्हटले आहे.