सारोळा (पुणे), प्रतिनिधी – भोर पंचायत समितीच्या उपअभियंत्याला 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिंबधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. जयंत ताकवले असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते भोर पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात उपअभियंतापदी कार्यरत आहेत. लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेली माहितीनुसार, तक्रारदार यांचे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे पाईप खरेदीचे बिल मंजुर केल्याचा मोबदला म्हणून ताकवले यांनी तक्रारदार यांच्याकडे बिलाचे 2 टक्के प्रमाणे 70 हजार रूपये
लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता सापळा रचून एसीबीने उपअभियंत्याला अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत.
दरम्यान, एका महिन्यात भोर पंचायत समितीत लाच घेतल्याप्रकरणी दोन कारवाई झाल्या आहेत. या घटनेमुळे लाच मागण्याचे प्रकार भोर तालुक्यात सुरूच असून शासकीय अधिकारी, कर्मचारी लाच मागण्यात निर्ढावलेले असल्याचे समोर येत आहे.