MPL 2024 : ओम भोसलेची तूफानी खेळी, छत्रपती संभाजी किंग्सचा विजयी चौकार…

Maharashtra Premier League 2024 (Match No 22) :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत तेराव्या दिवशी दुसऱ्या लढतीत ओम भोसले(नाबाद ८१धावा) व मुर्तझा ट्रंकवाला(४७धावा)यांच्या धडाकेबाज शतकी सलामी भागीदारीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
रत्नागिरी जेट्स विरुद्ध छ. संभाजी किंग्स या सामन्यात छ. संभाजी किंग्स संघाने फलंदाजीचा उत्तम नमूना साजरा करत १५२ ची धावसंख्या अवघ्या १७.५ षटकात पूर्ण करत सामना जिंकला.#MPL #MPL2024 #MahaCricket #MCA pic.twitter.com/5t34KC3YGF
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) June 14, 2024
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्स संघासमोर विजयासाठी १५२ धावांचे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी १७.५ षटकात २बाद १५५धावा करून पूर्ण केले. आघाडीचा फलंदाज ओम भोसलेने ५४चेंडूत नाबाद ८१ धावांची सुरेख खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने १०चौकार व १ षटकार मारला. त्याला मुर्तझा ट्रंकवालाने ४०चेंडूत ४चौकार व १ षटकारासह ४७धावांची खेळी करून साथ दिली. या सलामीच्या जोडीने ७६ चेंडूत ११४ धावांची भागीदारी करून सामन्यावर आपली पकड भक्कम केली. मुर्तझा ट्रंकवाला विजय पावलेच्या गोलंदाजीवर त्रिफळा ४७ धावांवर बाद झाला. पाठोपाठ दिग्विजय पाटील(३)धावांवर त्रिफळा बाद होऊन तंबूत परतला. ओम भोसलेने दिग्विजय पाटील(नाबाद ८)च्या साथीत संघाचा विजय सुकर केला.
तत्पूर्वी, रत्नागिरी जेट्स संघाने संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६बाद १५२धावा केल्या. सलामवीर धीरज फटांगरे(२७) व प्रीतम पाटील(१४)या सलामीच्या जोडीने २१चेंडूत ३३धावांची भागीदारी केली. मात्र, हि जोडी फुटताच धावगतीला ब्रेक लागला. कर्णधार अझीम काझी(९), दिव्यांग हिंगणेकर(९) मधली फळी देखील तंबूत परतली. त्यानंतर किरण चोरमलेने ३१चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी करून धावफलक हलता ठेवला. त्यात त्याने ४चौकार व १षटकार मारला. त्याला अभिषेक पवारने २१चेंडूत ४चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३४ धावा करून साथ दिली.
T20 World Cup 2024 : भारत-कॅनडा आज आमने-सामने; सामन्यावर पावसाचे सावट…
अभिषेक ३४ धावांवर असताना पायाच्या दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. किरण व अभिषेक वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. छत्रपती संभाजी किंग्सकडून हितेश वाळुंज(२-२४), आनंद ठेंगे(२-४३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स: २० षटकांत ६ बाद १५२ (किरण चोरमले नाबाद ४१, अभिषेक पवार ३४; हितेश वाळुंज २-२४, आनंद ठेंगे २-४३) पराभुत वि. छत्रपती संभाजी किंग्स: १७.५ षटकांत २ बाद १५५ (ओम भोसले नाबाद ८१, मुर्तझा ट्रंकवाला ४७; विजय पावले २-३२); सामनावीर – ओम भोसले.





