मुंबई – क्रूडचे दर उच्च पातळीवर असताना भारतीय शेअर आणि रोखे बाजारातून परदेशी गुंतवणूक परत चालली आहे. त्यामुळे भारताची चालू खात्यावरील तूट वाढण्याच्या शक्यतेमुळे रुपयाचे मूल्य कमी होत आहे. सोमवारी रुपयाचा भाव 26 पैशांनी कमी होऊन 76 रुपये 68 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. गेल्या दोन महिन्यापासून कच्चे तेलाचे दर 100 डॉलरच्या वर आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80% कच्चे तेल आयात करतो.
त्यामुळे भारताकडील परकीय चलनाचा साठा वेगाने कमी होत आहे. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. रुपयाचे घसरणारे मूल्य कमी होण्यासाठी भारतीय निर्यातदारांनी रशिया व युक्रेन वगळता इतर देशांना निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे गेल्याच आठवड्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भारताला अनावश्यक आयात कमी करावी लागणार आहे.