पिंपरी – श्री मंगलमूर्तींची माघी यात्रा यंदा करोनामुळे रद्द करण्यात आली आहे. चिंचवडच्या मंगलमूर्तींच्या पालखीचे देव गाडीतून रविवारी (दि. 14) मोरगावकडे प्रस्थान ठेवले. ही यात्रा करोनामुळे साध्या पद्धतीने मर्यादित स्वरुपात साजरी होणार असल्याची माहिती, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी यापूर्वीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
इ. स. 1561 साली महान गणेशभक्त श्री मोरया गोसावी यांनी चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. त्यांना श्री क्षेत्र मोरगाव येथे तपश्चर्येने श्री मंगलमूर्तींची मूर्ती प्राप्त झाली आहे. ती मूर्ती वर्षांतून दोन वेळा श्री क्षेत्र मोरगावला पालखीतून व रथातून नेण्याची प्रथा आहे. माघी यात्रा मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक अशी असते. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रेचे चिंचवडहून रविवारी (दि. 14) रोजी दुपारी मोरगावकडे प्रस्थान ठेवले.
सध्या देशात, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी माघी यात्रा 14 ते 19 फेब्रुवारी या काळात संपन्न होणार आहे. यावर्षी माघी यात्रेचा कालावधी कमी करण्यात आला असून, तो 6 दिवसांचाच राहील. करोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्या काही महिन्यांत सर्व धार्मिक सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने, लोकांनी एकत्र न येता साजरे केले आहेत. यात्रा 14 फेब्रुवारी रोजी मोरगावला जाणार आणि 19 फेब्रुवारीला देव गाडीतून येणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी. यावर्षी श्री मंगलमूर्तींची यात्रा करोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार पार पडणे आवश्यक असल्याचे मंदार महाराज देव यांनी सांगितले.