नवी दिल्ली – काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांच्याकडे सध्या उत्तर प्रदेश राज्य काँग्रेसची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तब्बल ८० खासदार असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्याला लोकसभेत जाण्याचे द्वार म्हटले जातं. या राज्याची जबाबदारी प्रियंका गांधी पार पाडत आहेत. तसेच भाजपचा आक्रमकतेने प्रतिकार करत आहेत. प्रियंका गांधीच भाजपचे आव्हान संपुष्टात आणेल असा आशावाद काँग्रेसमध्ये व्यक्त करण्यात येतो. काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियंका गांधी यांना दुर्गेचा अवतार म्हटलं आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियंका गांधी या दुर्गा मातेचा अवतार असल्याचं म्हटलं. तसेच त्यांच्याच हातून भाजपचा वध होणार असल्याचं वक्तव्य करत नव्या वादालाही तोंड फोडलं. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी प्रियंका गांधी या सर्वात मोठ्या हिंदू असल्याचं म्हटलं. तसंच त्या दुर्गा मातेचा अवतार असून मंदिरात दर्शन करणं, प्रायागमध्ये स्नान करणं, हातांमध्ये रुद्राक्ष घालणं या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी असल्याचं त्यांनी नमूद केलं. भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार असल्याचंही ते म्हणाले.
प्रियंका गांधी यांनी नुकतचे उत्तर प्रदेशातील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रयागमध्ये स्नान केल होता. तसेच होडीत बसल्या होत्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातच आचार्य प्रमोद कृष्णम यांनी त्यांचं कौतुक केलं.
आचार्य प्रमोद कृष्णम हे प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरून लोकसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.