महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची शिक्षण आयुक्तांकडे मागणी
पुणे(प्रतिनिधी) – प्राथमिक शिक्षण संचालनालयातील प्रमुख अधिकारी बऱ्याचदा अनुपस्थित राहात असल्याने शिक्षक, संस्थांची कामे प्रलंबित पडतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने शिक्षण आयुक्तांकडे केली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हा प्राथमिकचे सरचिटणीस रणजित बोत्रे, पुणे जिल्हा माध्यमिकचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, पुणे शहर प्राथमिकचे सरचिटणीस अतुल शेलार यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयात प्रशासन अधिकारी मिलिंद देशमुख, अधिक्षक श्रीधर शिंत्रे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले.
लॉकडाऊन काळात शासनाने 15 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीप्रमाणे कार्यालये सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नियमांचे पालन करण्याबाबतही स्पष्ट केले होते. मात्र, प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, सहसंचालक दिनकर टेमकर हे कार्यालयात फारसे आढळून येत नाहीत.
शिक्षक, संघटना, संस्थांचे पदाधिकारी कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त पाठपुरावा करण्यासाठी कार्यालयात येत असतात. मात्र, अनेक शिक्षकांची, संस्थांची कामे प्रलंबित राहतात. कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना सर्वांना तोंड द्यावे लागते. पण कुठल्याही प्रश्नाचे अचूक उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही, असे म्हणत शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शालेय पोषण आहार या विभागाचाही कार्यभार आहे. त्यामुळे सर्वच कार्यालयात ते थोडा-थोडा वेळ उपस्थित रहातात, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.