पिंपरी -ताडगोळा म्हणजे उन्हाची काहिली कमी करणारे थंड, मधुर, रसदार फळ. सध्या ऊन दिवसेंदिवस वाढत असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये ताडगोळ्यांना मागणीही वाढत आहे. शहरामध्ये 150 ते 170 रुपये डझन ताडगोळे मिळत आहेत. उन्हाच्या काहिलीमध्ये तहान भागवण्यासाठी देखील या फळाचा वापर होतो. त्यामुळे सद्यस्थितीत ताडगोळ्यांना मागणी वाढली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोकणातून ताडगोळा आणला जातो. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यामधून देखील ताडगोळा येतो. कोकणातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्याची झाडे आहेत. ताडाच्या झाडावर चढण्यात येथील तरुण तरबेज असतात. उन्हाळ्यामध्ये याच्या विक्रीतून स्थानिकांना चांगले पैसे मिळतात.
तर शहरी भागामध्ये ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबत, उसाचा रस, कैरीचे पन्हे, शहाळे असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. काहींना थंडगार पेय, आईस्क्रीमचा मोह देखील असतो. मात्र यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक थंडावा देणारी फळे व पेयाकडे नागरिकांचा कल असतो. शरिराचा दाह कमी करण्यासाठी ताडगोळ्यांचा पर्याय देखील निवडला जातो. सध्या हेच ताडगोळे शहरातील रस्त्यांवर दिसत आहे. तर नागरिक देखील ताडगोळे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
ताडगोळ्यांचे अनेक फायदे
उन्हाळ्यातील विविध आजारांवर हे ताडगोळे उपयोगी ठरतात. पोटातील उष्णता कमी करण्यासाठी, मूत्रसंसर्ग रोखण्यासाठी तसेच तहान भागवण्यासाठी ताडगोळ्यांचा वापर होतो. ताडगोळ्यांचे अनेक फायदे आहेत. सध्या एका ताडगोळ्याची किंमत 15 ते 20 रुपये आहे. तर 150 ते 170 रुपये डझन याप्रमाणे देखील विक्री केली जाते. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ताडाच्या (माड) झाडाला येणाऱ्या फळामधून थंडगार ताडगोळे मिळतात. नारळाच्या आकाराच्या असलेल्या एका फळामध्ये तीन ते चार ताडगोळे असतात. एका झाडावर दीडशे ते दोनशे ताडफळे मिळतात. शहरात अनेक ठिकाणी हे ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आम्ही कोकणातून ताडगोळे आणतो. तेथून आम्हाला 5 ते 8 रुपयांप्रमाणे एक ताडगोळा मिळतो. वाहतूक खर्च वाढल्याने यंदा आम्ही 15 ते 20 रुपये या प्रमाणे विक्री करतो. गतवर्षी एक ताडगोळा 10 रुपयांना विकला जात होता. या फळामुळे शरीरामध्ये थंडावा येतो. त्यामुळे याला उन्हाळ्यामध्ये मागणी असते.
– रवी कुमार, विक्रेता.