करोना विषाणूच्या भीतीने सॅनिटायझरची मागणी वाढली

पुणे – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित स्वच्छ हात धुवावे, नाका-तोंडाला हात लावू नये, सॅनिटायझरचा वापर करावा, शिकणे किंवा खोकल्यावर हात स्वच्छ धुवावे असा सूचना आरोग्य विभागाकडून वेळोवेळी दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून सॅनिटायझरची मागणी वाढली असून, सद्य:स्थितीमध्ये शहरातील बहुतांश मेडिकलमधील सॅनिटायझरचा साठा संपला आहे. त्यामुळे सॅनिटायझर कुठे मिळेल याबाबत विचारणा करून नागरिकांनी मेडिकलमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव अमेरिका, थायलंड, इरान, हॉंगकॉंग, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, इटली या देशांमध्ये पसरलेला आहे. तर आता भारतातही करोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामध्ये दिल्ली, तेलंगणा याठिकाणी रुग्ण आढळले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसून, नागरिकांनी घाबरून जावू नये. “भीती बाळगू नका मात्र खबरदारी घ्या’ असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

या विषाणूचा प्रादुर्भाव बाधित देशातून आलेल्या व्यक्‍तींशी संपर्क झाला तरच होण्याची शक्‍यता आहे. अन्यथा हवामनबदलामुळे झालेली सर्दी, ताप, खोकला हे नियमित औषधोपचार केल्याने बरा होईल. विशेषत: या विषाणूपासून वाचण्यासाठी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. दिवसातून किमान आठ ते दहा वेळा स्वच्छ साबण, हॅन्डवॉशने हात धुवावा. बाहेर फिरणाऱ्या व्यक्‍तींनी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आल्यामुळे नागरिकांनी तत्काळ मेडिकल स्टोअर गाठत सॅनिटायझर खरेदी केली. सध्या सॅनिटायझर मोठी मागणी असून, शहरासह जिल्ह्यातील बहुतांश मेडिकल स्टोअरमध्ये सॅनिटायझरचा साठा संपलेला आहे.

आता घरगुती सॅनिटायझर पुरविले जात आहे…
शहरातील बहुतांश मेडिकल स्टोअरमधील सॅनिटायझरचा साठा संपलेला आहे. मात्र, नागरिकांकडून वारंवार चौकशी करून सॅनिटायझर आले का? असे विचारले जात आहे. त्यावर काही मेडिकल स्टोअर व्यावसायिकांनी लोकल फार्मासिटकलवाल्यांकडून तयार करण्यात येत असलेले सॅनिटायझर मेडिकलमध्ये ठेवून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. याची किंमत 80 ते 100 रुपये इतकी असून, खरच हे सॅनिटायरझ उपयोगाचे आहे का? केवळ फसवणूक केली जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.