मुंबई – मिझोरम येथील माजी ज्युनियर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस विजेता लालरिन पुईया याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून जवळपास साडेचार वर्षे लालरीन नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात होता. मात्र, या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयने पुराव्याअभावी महत्त्वाचा निर्णय देत त्याची निर्दोष सुटका करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर मंगळवारी लालरीन याची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
2017 साली एक स्पर्धा खेळून भारतात परत येत असताना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर लालरीनजवळ 3.9 किलो ड्रग्स आढळून आल्याचे सांगितले गेले होते. तेव्हापासून जवळपास साडेचार वर्षे लालरीन नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात होता.
मात्र, या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मिझोरम राज्य स्टेट टेबल टेनिस संघटना तसेच अनेक हितचिंतकही होते व त्यांनी त्याच्या सुटकेसाठी तसेच न्यायालयीन लढाईसाठी तब्बल 17 लाख रुपये खर्च केला.
ऑलिम्पिक पदकाचे ध्येय
माझ्या आयुष्यात गेल्या साडेचार वर्षे जे काही झाले. त्यातून मी आता बाहेर पडलो आहे. आता मला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहायचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात अनेक संकटे येतात. मीदेखील अशाच संकटात सापडलो होतो, पण जेलमधून सुटका झाल्यानंतर आता मी निराश होणार नाही. पुन्हा नवीन जिद्दीने मी जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एवढेच नव्हे तर भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे, असेही त्याने सांगितले.