वॉशिंग्टन – जगाच्या पाठीवरील कोणताही देश असो टपाल कार्यालयाने उशिरा केलेली डिलिव्हरी नेहमी चर्चेचा विषय असतो आता याबाबत एक नवीन घटना समोर आली असून अमेरिकेतील मिशिगनमधील एका महिलेला तिच्या मेलबॉक्समध्ये तब्बल 100 वर्षे जुन्या पोस्ट कार्डची डिलिव्हरी करण्यात आली आहे.
ब्रिटनी कीच असे या महिलेचे नाव असून तिच्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या टपाल पेटीमधील पत्रे तिने गेल्या आठवड्यात बाहेर काढली तेव्हा त्या अनेक पत्रांपैकी एक पोस्टकार्ड तब्बल 100 वर्षे जुने असल्याचे तिच्या लक्षात आले.
पत्रावर जॉर्ज वॉशिंग्टनचे चित्र असलेला स्टॅम्प होता आणि त्याच्यावर 29 ऑक्टोबर 1920 ही तारीख होती पत्र रॉय मॅक्वीन नावाच्या महिलेला लिहीण्यात आले होते यामध्ये काही कौटुंबिक संदर्भही होते पत्रावरील सही फ्लॉसी बर्गेस नावाच्या महिलेने केली होती.
ज्या महिलेला तब्बल 100 वर्षानंतर हे पत्र मिळाले आहे तिने हे पत्र मूळ मालकापर्यंत कसे पोहोचवता येईल याविषयी चाचपणी आता सुरू केली आहे तीने फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या पत्राची माहिती सर्वत्र दिली आहे. मीडियावर हा विषय चर्चेत आल्यानंतर एका युजरने या विषयाची अधिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर त्याने काही लोकांच्या मदतीने तपास केला असता ज्या महिलेला शंभर वर्षांपूर्वी हे पत्र पाठवण्यात आले होते. ती महिला आत्ताच्या पत्त्यावर राहत होती. त्यामुळेच ते पत्र शंभर वर्षानंतर कीच नावाच्या या महिलेला डिलिव्हर करण्यात आले पण ते पत्र 100 वर्षांपूर्वी वेळेत का पोहोचवण्यात आले नाही याचे उत्तर मात्र मिळाले नाही.