Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात काल 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या बंडांनंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असणार आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी ‘दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही. कालही… आजही…!!!’ असं कॅप्शन दिले आहे. सोबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील नाटकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. “इथल्या पाण्याच्या थेंबाथेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या सळसळत्या रक्ताचा हा अंगार या मनामनात धगधगता ठेवाल. कटकारस्थानं होतंच राहतील, या ना त्या मार्गाने विष प्रयोग होतच राहतील. या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजीरुपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल आणि सळसळेल मराठमोळ्या धमन्यांमध्ये,” असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.
दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही.
कालही… आजही…!!!#Saheb #SharadPawar #AmolKolhe@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule pic.twitter.com/W2RxC3TRnu— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 6, 2024
दरम्यान निकालानंतर ट्वीटमध्ये अजित पवार म्हणाले की, “आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी ट्विटमध्ये स्वत:ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आहे. इतके दिवस अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष हा शब्द वापरला नव्हता. पण आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार यांनी स्वत:ला अध्यक्ष म्हणून घोषित केलं आहे. यानंतर काल अनेक ठिकाणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.