नवी दिल्ली- पाच महिन्याच्या अवधीनंतर दिल्लीतील मेट्रोसेवेला पुन्हा प्रारंभ झाला आहे. तथापि या सेवेसाठी नवी तिकीट सिस्टीम सुरू करण्यात आली त्यामुळे मात्र त्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागला आहे.
प्रवाशांनी कॅशलेस पद्धतीने नवीन स्मार्ट कार्ड घ्यावे, अशी सूचना प्रवाशांना करण्यात आली, पण अनेकांना नेटवर्क मधील समस्येमुळे हे नवीन स्मार्ट कार्ड घेता आले नाही. अंडरग्राऊंड स्थानके असलेल्या ठिकाणच्या प्रवाशांना ही अडचण प्रकर्षाने जाणवली. अशी स्थानके मध्यवर्ती भागात चांदनी चौकातही आहेत.
करोना विषाणूंचा प्रसार टाळण्यासाठी पूर्वीची टोकन सिस्टीम दिल्ली मेट्रोने बंद केली आहे. त्या ऐवजी हे स्मार्ट कार्ड सुरू करण्यात आले आहे. तथापि या कार्डचे पेमेंट रोख स्वरूपात स्वीकारण्याची कोठेही सोय नाही. सक्तीने ते कॅशलेस पद्धतीनेच करावे लागत असल्याने लोकांना समस्या येत आहेत.
दरम्यान या मेट्रो सेवेच्या आजच्या पहिल्या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद माफक स्वरूपाचाच होता.