नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने उद्या सोमवारी पुन्हा उत्पादनशुल्क धोरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यांना सोमवारी सकाळी अकरा वाजता सीबीआय मुख्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
त्यांना सोमवारी अटक करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरवाल यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की भगतसिंग कधी ब्रिटीशांच्या अटकेच्या धमकीला घाबरले नाहीत, ते फाशीलाही घाबरले नाहीत. सत्येंद्र जैन, मनिष सिसोदिया हे भगतसिंग आहेत त्यामुळे ते सरकारच्या असल्या दहशतीच्या कृत्याला घाबरणार नाहीत असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सिसोदिया यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल कोट्यवधी लोकांचे त्यांना आर्शिवाद आहेत असेही केजरीवालांनी नमूद केले आहे.
भाजपला अंधेरी पोटनिवडणूक ‘जड’ जाणार; ही 3 मुख्य कारणे असू शकतात https://t.co/l5RG305vcY
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
दरम्यान सीबीआयकडून बजावण्यात आलेल्या समन्सच्या संबंधात मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे की त्यांनी माझ्या घराची चौदा तास झडती घेतली. त्यांना काहीही सापडले नाही. त्यांनी माझे बॅंक लॉकरही तपासले त्यातही त्यांना काही सापडले नाही. त्यांनी माझ्या गावाकडे जाऊन तेथील घराचीही झडती घेतली तेथेही त्यांना काही सापडले नाही.आता त्यांनी मला पुन्हा चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मी त्यांना सहकार्य करीन, सत्यमेव जयते असे त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.