नवी दिल्ली – दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा दिल्ली विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आता सिसोदिया या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
दिल्लीतील उत्पादन धोरण संबंधात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याचे सांगत सीबीआयने मनिष सिसोदियांना अटक केली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने त्यांना 3 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर मनिष सिसोदिया यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा जामीन अर्ज आज फेटाळण्यात आला आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीतील मद्य धोरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने मनी लॉंड्रिंगप्रकरणी मनिष सिसोदिया यांची दोन दिवस चौकशी केली. या प्रकरणात ईडीनेही तपास सुरू आहे.