सोलापूर: महाजनादेश यात्रेच्या समारोपनिमित्त रविवारी सोलापुरात भाजपची सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सोलापुरातील चौकाचौकात भाजप कार्यकर्त्यांनी लावलेले डिजिटल फलक महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी हटविले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील चौकाचौकात बेकायदा डिजिटल उभे केले आहेत. कार्यकर्त्यांनी नो डिजिटल झोनमधील जागा रिकामी सोडली नाही. त्यामुळे याची दखल घेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महापालिका आयुक्त दिपक तावरे यांना बेकायदा डिजीटल फलक हटविण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात सात रस्ता, पार्क चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, चार पुतळा परिसर येथील बेकायदा डिजिटल हटविले आहेत.