शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जुन्या पुलाजवळील सार्वजनिक शौचालयासमोर दररोज भाजीपाला बाजार भरविला जात आहे. भरविल्या जाणाऱ्या भाजीपाला बाजारामुळे येथील शौचालयाचा वापर करणाऱ्या महिला व नागरिकांची कुचंबना होत असल्यामुळे येथील बाजार हटविण्याची मागणी माहिती सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्रापूर येथे जुना पूल परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयाचा गावातील काही कुटुंब तसेच नागरिक, महिला नियमित वापर देखील होत आहे, परंतु काही दिवसांपासून येथील सार्वजनिक शौचालयासमोर दररोज भाजीपाला बाजार भरविला जात असल्यामुळे शौचालयाचा वापर करणाऱ्या नागरिकांची तसेच महिलांची गैरसोय होऊन कुचंबना होत आहे. त्यामुळे येथील बाजार तातडीने दुसरीकडे हलविण्यात यावा याबाबतची मागणी माहिती सेवा समितीचे शिक्रापूर अध्यक्ष संतोष काळे यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत शिक्रापूर यांचेकडे केली आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील काळे यांनी दिला आहे. दरम्यान, दररोज भरल्या जाणाऱ्या भाजीपाला बाजारासाठी मोठी जागा नसल्याने सावलीमुळे त्या ठिकाणी बाजार भरला जात आहे, परंतु शौचालयासमोरील बाजार शेजारील जागेमध्ये हटविला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी सांगितले.