नवी दिल्ली – काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केलेल्या एका ट्विटनं संबंध भारतीयांचे श्वास रोखून धरले होते. पंतप्रधानांच्या ‘त्या’ ट्विटनंतर सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमांवर केवळ एकच चर्चा सुरु होती आणि ती म्हणजे, ‘पंतप्रधान मोदी सोशल मीडियाचा वापर थांबवणार!’.
एकीकडे पंतप्रधानांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत मोदी समर्थकांनी ट्विटरवर #NoSir असा हॅशटॅग ट्रेंडिंग केला तर दुसरीकडे विरोधकांनी मोदींच्या निर्णयावर आगपाखड केली. मात्र मोदींनी याबाबत आपल्या ट्विटर खात्यावरून आज दुपारी आणखी एक ट्विट करत भारतीयांच्या मनातील संभ्रम अखेर दूर केला.
मोदींनी आजच्या आपल्या ट्विटमध्ये, महिला दिनानिमित्ताने आपली सोशल मीडियावरील अकाउंट्स एका दिवसासाठी कर्तबगार स्त्रियांना चालविण्यास देणार असून यामागे या कर्तबगार महिलांकडून इतर देशवासियांना प्रेरणा मिळावी असा उद्देश असल्याचं स्पष्ट केलं.
giving up शब्दामुळे निर्माण झालेला संभ्रम give away शब्दामुळे मिटला…
मात्र काल रात्रीपासून मोदींच्या ट्विटमधील एका इंग्रजी शब्दामुळे निर्माण झालेला गोंधळ आज ‘तो’ बदलल्यामुळे मिटला आहे. त्याचं झालं असं की, पंतप्रधान मोदींनी काल आपल्या ट्विटरवर, “This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.” असा संदेश लिहला होता. या संदेशातील giving up या शब्दाचा अर्थ सोडून देणे असा होत असल्याने सर्वांनी मोदी सोशल मीडियाचा वापर करणं सोडून देतील असे कयास बांधले. मात्र सरप्राईझ देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मोदींनी आज सस्पेन्स ब्रेक करत, “This Women’s Day, I will give away my social media accounts to women whose life & work inspire us. This will help them ignite motivation in millions. Are you such a woman or do you know such inspiring women? Share such stories using #SheInspiresUs.” असा संदेश दिला. यातील give away या शब्दाचा अर्थ वापरण्यास देणे असा होत असल्याने आता हा संभ्रम दूर झाला आहे.