नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या (रविवार) पासून तीन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर रवाना होत आहेत. भारत आणि इजिप्त दरम्यानचे संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि इजिप्त दरम्यानचे संरक्षण सहकार्य अधिक वाढवण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांदरम्यान एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्यादेखील केल्या जाणार आहेत, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
उद्यापासूनच्या इजिप्त दौऱ्यादरम्यान भारत आणि इजिप्त दरम्यानचे संरक्षण सहकार्याचे संबंध दृढ करण्यासाठी इजिप्तचे संरक्षण मंत्री जनरल मोहम्मद अहमद झाकी यांच्याबरोबर आपली द्विपक्षीय चर्चा होणार आहे, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
या दौऱ्यादरम्यान संरक्षण संबंधांचा आढावाही घेतला जाणार आहे. दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान थेट संवाद प्रणाली विकसित व्हावी, यासाठी नवीन व्यासपीठ विकसित केले जाईल आणि दोन्ही देशांदरम्यानच्या संरक्षण उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांचीही भेट घेणार आहेत.