नवी दिल्ली – रशियामध्ये सैन्याच्या बदनामीच्या आरोपात दोषी आढळलेल्या व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. रशियाच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये या आशयाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. सैन्याबद्दल जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवण्याच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या व्यक्तीची सर्व आर्थिक, स्थावर मालमत्तेसह अन्य मौल्यवान मालमत्ताही जप्त केली जाणार आहे. हे विधेयक गेल्याच आठवड्यात संसदेच्या कनिष्ठ सभागृहातही तितक्याच तत्परतेने मंजूर करण्यात आले आहे. आता अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची मंजूरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.
देशाच्या सैन्यदलावर चिखलफेक करणाऱ्या देशद्रोह्यांवरील कारवाई अधिक कठोरपणे करण्यास या नवीन कायद्यामुळे मदत होईल, असे संसदेचे सभापती वॅचेस्लाव वोलोदिन यांनी म्हटले आहे.
रशियामध्ये अध्यक्ष पुतीन यांच्या टीकाकारांना शांत करण्यासाठी सैन्याच्या बदनामीच्या कायद्याचा नेहमीच दुरुपयोग केला जातो. दहशतवादाचे समर्थन करण्याचे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकले जात असते. गेल्या वर्षभरात अनेक कार्यकर्ते, ब्लॉगर आणि सर्वसामान्य नागरिकांना या कठोर कायद्याखाली दीर्घकाळाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.