मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपाली सय्यद या आपल्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. आता देखील दीपाली यांनी भाजप खासदार ब्रूजभूषण सिंह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे तेच ब्रूजभूषण सिंह आहेत ज्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता.
दीपाली सय्यद या शिवसेनेच्या पदाधिकारी देखील आहेत. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय वातावरणाबाबत त्या सोशल मीडियावरून सतत व्यक्त होत असतात. यावेळी देखील त्यांनी आपल्या फेसबुकवर भाजप खासदार ब्रूजभूषण सिंह यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात,भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषण सिंग म्हणजे डॅशिंग माणुस जे बोलतो ते करतो, महिला महाराष्ट्र केसरी लवकरात लवकर व्हावी याकरीता हि भेट झाली. लवकरच ते मुंबईत येणार आहेत. भेट झाल्याबद्दल पवार साहेबांचे खुप धन्यवाद !
ब्रूजभूषण सिंह मुंबईत येणार म्हंटल्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याबाबत काय ऍक्शन घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा नियोजित असताना ब्रूजभूषण सिंह यांनी ठाकरेंना थेट माफी मागण्याचं आव्हान दिल होत त्यानंतर राज ठाकरेंना आपला दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर आता ब्रूजभूषण हे जर मुंबईत येणार असतील तर मनसे त्यांचं नेमकं स्वागत कस करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.