नवी दिल्ली –केंद्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन उणे 10.4 टक्के इतके झाले आहे.
जुलै महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता उणे 11.1 टक्के, खाण क्षेत्राची उत्पादकता उणे 13 टक्के आणि ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता उणे 2.5 टक्के मोजली गेली आहे. लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रावर परिणाम झाला होता. आता यात हळूहळू सुधारणा होईल असे सांगण्यात आले.
कृषी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राची पीछेहाट चालू असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेसह बहुतांश मूल्यांकन करणाऱ्या संस्थांनी या वर्षाचा विकासदर उणे 10 टक्क्यांच्या खाली राहील असे सांगितले आहे. आज मुडीज् या पतमानांकन करणाऱ्या संस्थेनेही या वर्षाचा भारताचा विकासदर उणे 11.5 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. ही संस्था भारताबाबत आशावादी होती. त्यामुळे या संस्थेने याअगोदर भारताचा विकासदर उणे 4 टक्के राहील असे म्हटले होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये परिस्थिती बिघडली आहे.