पुणे – पोलीस आयुक्तालयात चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या एकाने स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली होती. संबंधीत तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप करत तो पोलीस यंत्रणेचा बळी ठरल्याचे म्हटले आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (42,रा.खडकी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पिंगळे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तलय कार्यालयात आला होता. तेथे चारित्र्य पडताळणी कक्षेत त्याचेवर दोन गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याने माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे सांगत अचानक सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत पेटवून घेतले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पेट घेतलेल्या अवस्थेतच पोलीस आयुक्तलयाचे कार्यालयात पळत गुन्हे शाखेच्या इमारतीकडे गेला. गेटवरील बंदोबस्तावरील कर्मचारी व गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्याच्या मागे धावत गेले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्नीशामक दलाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले . भाजलेल्या अवस्थेत पिंगळेला ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यानंतर त्याच्यावर सुर्या हॉस्पिलमध्ये उपचार करण्यात येत होते. तो 90 टक्के भाजला असल्याचे रुग्णालयाने सांगितले होते.
दरम्यान, बुधवारी पोलिसांना त्याच्या बॅगेत काही कागदपत्रे सापडली होती. यामध्ये एक सुसाईड नोटसही होती. यामध्ये त्याने पोलीस यंत्रणेच्या त्रासाबरोबरच घरगुती आणी काही मित्रांकडून होणाऱ्या त्रासा बद्दल लिहले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच्या पत्नीने बंडगार्डन पोलिसांना एक अर्ज दिला आहे. त्यामध्ये पोलिसांनी तो व्यवस्थित शुध्दीवर असताना जबाबाची नोंद केली नाही. तसेच मागील दोन महिण्यात चारित्र्यपडताळणीसाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळ्याने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचीही नावे घेतली गेली आहेत.