- 122 नवीन रुग्णांची नोंद
- 98 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासांत 10 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 122 नवीन करोनाबादित रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत शहरामध्ये 95070 जणांना करोनाची लागण झाली आहे.
महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 18) दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 122 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 7 व शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील चिखली, मोशी, काळेवाडी, रावेत, चिंचवड व रहाटणी येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील बारामती, तळेगाव व कोंढवा येथील 3 जणांचा मृत्यू झाला.
तर गेल्या 24 तासांत 98 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे करोनावर मात केल्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 91707 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2510 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1674 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 719 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 911 इतकी आहे.