नीरा -येथील एका 68 वर्षीय करोना रुग्णाचा “होम आयसोलेशन’मध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि रुग्णाच्या नातेवाईक यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. त्यामुळे करोनाचा अटकाव करण्याबाबत पुरंदर तालुक्यातील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आता फारशी गंभीर नसल्याचे अधोरेखित होत आहे. या घटनेने नीरा शहरात खळबळ माजली आसून आणखी किती रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत? याबाबत विचारणा होत आहे.
नीरा (ता. पुरंदर) येथील 68 वर्षीय व्यक्तीला डॉक्टरांनी दि. 30 नोव्हेंबर रोजी करोना चाचणी करण्यासंदर्भात सांगितले होते. त्यानुसार खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना जेजुरी येथील ट्रिपल सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. या सेंटरमध्ये गेल्यानंतर या रुग्णाच्या केमिस्ट मुलाने आणि घरीच उपचार घेतो याबाबत खात्री दिल्याने रुग्णाला घरी सोडण्यात आले, असे समजते. यानंतर या रुग्णाच्या मुलाचा देखील करोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
मात्र, 68 वर्षीय रुग्णास गुरुवारी (दि. 3) रात्री त्रास होऊ लागल्याने त्यांना लोणंद येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यांना नीरा येथील घरी आणले. अनेक नातेवाइक, लोक अंत्यविधीसाठी घरी आले होते. यावेळी कोणत्याही प्रकारे करोनाच्या अनुषंगाने उपायोजना केल्या नव्हत्या. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबतची माहिती मिळाल्यानंतर येथील आरोग्य कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले.
त्यानंतर त्यांनी संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आणि उपस्थितांची घाबरगुंडी उडाली अन् अंत्यसंस्काराचा प्रश्न समोर उभा राहिला. प्राथमिक आरोग्य केंद्राने याबाबत जेजुरी नगरपरिषदेला यासंदर्भात माहिती देऊन जेजुरी नगरपरिषदेची शव वाहिनी मागवून घेतली आणि या मृत व्यक्तीचा अंत्यविधी जेजुरी येथे करण्यात आला. दरम्यान, शनिवारी (दि. 5) नीरा परिसरातील पिंपरे खुर्द, कर्नलवाडी, मांडकी, थोपटेवाडी, नीरा शहरातही नव्याने करोना रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य प्रशासनाला माहितीच दिली जात नाही
संबंधित रुग्णांना घरी सोडल्यानंतर आजही स्थानिक आरोग्य प्रशासनाला याबाबतची माहिती दिली जात नाही. किंवा खासगी ठिकाणी चाचणी केलेल्या अनेक रुग्णांची माहिती आरोग्य प्रशासनाकडे दिली जात नाहीत. किंवा आरोग्य प्रशासनाकडून तशा प्रकारची यंत्रणा गांभीर्याने राबवली जात नाही. अनेकांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही ते सर्रास गावामध्ये फिरत आहेत. त्यामुळे नीरा परिसरामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
संबंधित घटनेची चौकशी करण्यात येत आहे. तालुक्यातील सासवड आणि जेजुरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे या पुढे कोणाला ही “होम आयसोलेशन’ न करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच नीरा शहरामध्ये रविवार (दि., 5) पासून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार आहे. नीरेतील नागरिक आरोग्य प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याने अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत.
– उज्ज्वला जाधव, वैद्यकीय अधिकरी, पुरंदर तालुका