ओतूर -जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून मानला जातो. त्यातच ऊस तोडणी सुरू असल्याने त्याचे लपणक्षेत्र कमी झाल्याने तो सध्या सैरभैर झाला आहे. पाळीव प्राणी, जनावरांवर वारंवार हल्ले करून तो फडशा पाडतच होता मात्र, आता त्याने आपला मोर्चा मानवाकडे वळवला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसांपूर्वी ओतूर (फापाळेशिवार) येथे एका दुचाकीवर झेप घेवून एकास जखमी केले होते. तर शुक्रवारी (दि. 4) रात्री पुन्हा एका दुचाकीवर त्याने झेप घेतली मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने दुचाकीवरील दोघेजण बालंबाल बचावले आहेत.
रामदास विठ्ठल लोहकरे आणि मनीषा विष्णू घोडे (वय 16) हे दोघे शेतातील काम आटोपून दुचाकीवरून ओतूर हद्दीतील फापाळे शिवार, ब्राह्मणवाडा रस्त्यालगत असलेल्या कालव्या जवळील आपल्या रहात्या घराकडे शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर थेट झेप घेऊन दुचाकीवर मागे बसलेल्या मनीषा घोडे यांच्या पायावर पंजा मारला.
तर दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखून दुचाकी वेगात पुढे नेल्यामुळे हे दोघेही बालंबाल बचावले आहेत. मात्र, या हल्ल्यात मनीषा या जखमी झाल्याने त्यांना शासकीय रुग्णवाहिकेने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान याच फापाळे शिवार परिसरात दोन दिवसांपूर्वी याच पद्धतीने दुचाकीस्वारावर थेट झेप घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्या घटनेत रोहोकडी येथील रवींद्र अर्जुन घोलप हे जखमी
झाले होते.
एकूण किती बिबटे?
वारंवार होणारे बिबट्याचे पाळीव प्राणी व मानवावरील हल्ले ही चिंताजनक बाब बनली आहे. या भागात एकूण किती बिबट्यांचा मुक्तसंचार आहे हे सांगणे कठीण असले तरी विविध ठिकाणी घडणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या परिसरातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणे देखील जिकिरीचे झाले आहे. तर फापाळे शिवार परिसरात दुचाकींवर लागोपाठ दोन हल्ले झाल्याने बिबट्या आक्रमक झाल्याचे सिद्ध होत आहे. तरी विपरीत घटना घडण्याअगोदर बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी जोर धरीत आहे.