यवत -पाटस (ता. दौंड) येथे पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरेश दत्ता लंगोटे. (वय 20 रा. भिंगोले, जि. नांदेड, सध्या रा.चौफुला) असे तरुणाचे नाव आहे. (दि.27) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना पाटस-बारामती रोडवर नवनाथ कुरूमकर यांच्या वीटभट्टीजवळील विहिरीमध्ये घडली.
चौफुला येथील गजानन अशोक कुंभार यांच्या वीटवाहतूक करणाऱ्या टेम्पोवर सूरज चालक म्हणून काम करीत होता. सूरज व त्याचे दोन कामगार मित्र कुरुमकरांच्या वीटभट्टीवर विटा भरण्यासाठी आले होते. यानंतर टेम्पोचालक सूरज लंगोटे व मित्र ज्ञानेश्वर कुंभार, राजेंद्र मस्के हे विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. सूरजने विहिरीत उडी मारली. मात्र तो लवकर पाण्यातून बाहेर आला नाही. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली.
पोलीस आणि नागरिकांनी सूरजला बाहेर काढून यवत येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
घातपाताचा संशय अहवालानंतर निवळला
सूरज याच्या डोक्यात तसेच डाव्या डोळ्यास मार लागल्याची जखम दिसत होती. डाव्या पायाच्या गुडघ्यावर मार लागल्याचे दिसत असल्याने नातेवाइकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक वाबळे यांनी कसून चौकशी केली. रुग्णालयाच्या वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.