मंचर – पुणे – पिंपळगाव बसवंत या चालत्या एसटी बसमध्ये एका 58 वर्षीय प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (दि. 5) दुपारी घडली आहे. या प्रवाशाचे नाव ज्ञानदेव शिवाजी चव्हाण (रा. भोसरी, मुळगाव उमरगा) आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत एसटी आगाराची बस (एमएच 40 वाय 5654) पुणे शिवाजीनगर येथून पिंपळगाव बसवंत येथे निघाली. भोसरी येथून ज्ञानदेव शिवाजी जाधव हे पत्नी मीना, मुलगा मयूर यांसह त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी चालले होते.
राजगुरुनगर एसटी बस स्थानक सोडल्यानंतर पेठ घाटाजवळ एसटी मंचरच्या दिशेने येत असताना ज्ञानदेव शिवाजी जाधव यांना अचानक उचकी आल्याने ते अस्वस्थ झाले.
एसटीतील इतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर चालक एस. के. तिलावट आणि वाहक एस. व्ही. पडे यांनी बस थांबून प्रवाशाची चौकशी केली असता त्यांची पत्नी मीना आणि मुलगा मयूर यांनी ज्ञानदेव यांना तातडीने रुग्णालयाची गरज असल्याने तेथे गाडी घेण्यासाठी सांगितले.
एसटी चालकाने मंचर जवळील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी बस घेतली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रतापराव हिंगे पाटील आणि रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांनी दवाखान्यात ज्ञानदेव चव्हाण यांना नेण्यासाठी मदत केली. डॉक्टरांनी ज्ञानदेव जाधव यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू तपासणीपूर्वीच झाल्याचे सांगितले आहे.