यवत – कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे. या विजयाचा नाथाचीवाडीकरांनी देखील फटाके फोडत, गुलाल आणि भंडारा उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र कसब्यातील निवडणूकीने दौंड तालुक्याला दुसरा आमदार मिळाला, अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र रंगू लागली आहे.
रवींद्र धंगेकर यांचं मूळ गाव दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी हे असून त्यांची वडीलोपार्जित शेतजमीन व घर देखील तेथे आहे. त्यांचं मूळ आडनाव हे झाडगे असून त्यांचे वडील हेमराज हे पुण्यात धंगेकर कुटुंबात दत्तक गेले आहेत. हेमराज हे सोने-चांदीचे कारागीर म्हणून ओळखले जातात.
व्यवसाय वाढवत असताना पुत्र रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले. ते स्वतः देखील सोने-चांदीच्या कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. व्यवसायाबरोबर राजकारणात येऊन सामाजिक कार्य करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. नगरसेवक पदावर असताना आपल्या मूळ गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
कसबा विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची होती. कसब्यातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती तर भारतीय जनता पार्टी कडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीकडून मोठ्या फरकाने रासने यांचा पराभव करत धंगेकर यांनी विजय मिळवला आहे.
दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी या गावात धंगेकर यांनी विविध विकास कामांना निधी मिळवून दिला असून गावच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. महाविकास आघाडीकडून कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी रवींद्र धगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते विजयापर्यंत नाथाचीवाडी या गावात जल्लोष करण्यात आला.
प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत ते निकालापर्यंत नाथाचीवाडीतील ग्रामस्थ कसब्यात तळ ठोकून होते. कसब्याच्या निवडणुकीची चर्चा दौंड तालुक्यात सुरु असून दौंड तालुक्यात भाजपचे आमदार राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने तालुक्याला दुसरा आमदार मिळाल्याची चर्चा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या पारा-पारावर रंगू लागली आहे.