फलटण/कोळकी – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, “दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीकडून दिल्या जाणाऱ्या 30 व्या राज्यस्तरीय “दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 177 व्या पुण्यतिथीदिनी केली. त्यामध्ये दै. “प्रभात’च्या सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांचा समावेश आहे.
“एबीपी माझा’चे नवी दिल्लीतील विशेष प्रतिनिधी प्रशांत कदम, पुणे येथील “जडणघडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे, “सकाळ’चे दुधेबावी (ता. फलटण) येथील वार्ताहर शशिकांत सोनवलकर, दै. “सत्यसह्याद्री’चे फलटण प्रतिनिधी विक्रम चोरमले यांना “दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
“दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना, “साहित्यिक गौरव दर्पण पुरस्कार’ नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक भगवान अंजनीकर यांना, कराड येथील ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील पुरस्कृत “धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार’ धावती मुंबई आणि डोंबिवली येथील सन्मान महाराष्ट्र न्यूजच्या मुख्य संपादिका कृतिका (श्वेता) पालव यांना घोषित करण्यात आला आहे. पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील “दर्पण’ सभागृहात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. व्यासपीठावर कणकवली येथील गोपुरी आश्रमाचे संचालक प्रा. राजेंद्र मुंबरकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेचे कार्यवाह कवी ताराचंद्र आवळे, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, अमर शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रा. राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते आचार्य जांभेकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रवींद्र बेडकिहाळ यांनी 2023 चे राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर केले. मराठी पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांचे वितरण 1993 पासून केले जात आहे.
अडीच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, आचार्य जांभेकर चरित्रग्रंथ व माहितीपट, शाल, श्रीफळ, असे दर्पण पुरस्कारांचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण मराठी पत्रकार दिनी दि. 6 जानेवारी 2024 रोजी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे संस्थेच्या “दर्पण’ सभागृहात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.