पुणे -भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष या पदासाठीची निवड प्रक्रिया दि. 20 मे पर्यंत केली जाणार असून यावेळी पाहिल्यांदाच भाजपकडून पुणे जिल्ह्यासाठी दोन अध्यक्ष नेमण्यात येणार आहेत.
माजी आमदार जगदीश मुळीक यांची तीन वर्षांची अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आल्याने या पदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, धीरज घाटे तसेच माजी आमदार मेधा कुलकर्णी ही नावे समोर आलेली आहेत. यासाठी शहरातील आठ विधानसभा अध्यक्ष तसेच महत्त्वाचे पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षाची निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निवड केली जाणार आहे. यादृष्टीने कार्यकारिणी सदस्य, पक्षसंघटनेतील पदाधिकारी, आमदार आणि खासदारांबरोबर चर्चा आहे.
दरम्यान, दोन जिल्ह्याध्यक्ष यावेळी निवडण्यात येणार आहेत. उत्तर आणि दक्षिण भागासाठी जिल्हाध्यक्ष अशी रचना असणार आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, मावळ तर दक्षिणेमध्ये मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड हे तालुके आहेत. दक्षिणेकडील तालुक्यांत आमदार राहुल कुल वगळता भाजपचा आमदार नाही. तर, उत्तरेकडे भाजपचा आमदार नाही. या पदांसाठी खेडमधून शरद बुट्टे पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे, प्रदीप कंद , दौंडमधून राहुल कुल यांच्या नावाची चर्चा आहे.