पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सूर्यकिरणे “श्रीं’च्या मूर्तीवर पडली आणि “गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष झाला. गुरुवारी सकाळी भाविकांना हा सोहळा अनुभवला.
दगडूशेठ गणपती मंदिरात सकाळी 8 वाजून 16 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. दरवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे “श्रीं’च्या मूर्तीवर पडतात. गुरुवारी सकाळी 8 वाजून 16 मिनिटे ते सकाळी 8 वाजून 19 मिनिटांपर्यंत किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. “श्रीं’च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीसह देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या मूर्तींवर सूर्यकिरणे पडली होती.
माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा अनुभवायला मिळतो. मागील तीन दिवसांपासून सूर्यकिरणे “श्रीं’च्या मूर्तीवर पडत आहेत. मंदिराची रचना पूर्वाभिमुख आणि उंच असल्याने गाभाऱ्यात सूर्यकिरणांचा प्रवेश होत असल्याचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.