वाघोली (प्रतिनिधी) – शिरसवडी गावचा विकास करून व विकासाचा आलेख सतत उंचावत राहील यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या साथीने ग्रामस्थांच्या मदतीने आगामी काळात समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहून शिरसवडी गाव विकासाच्या नव्या उंबरठ्यावर आणणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित सरपंच सीमा नामदेव गावडे यांनी व्यक्त केला आहे.
शिरसवडी तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सीमा नामदेव गावडे यांची निवड तर उपसरपंच पदी किरण लालासाहेब शिंदे यांची निवड झाल्याने शिरसवडी गावडेवाडी ग्रामस्थांच्यावतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सीमा नामदेव गावडे बोलत होत्या. शिरसवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा उद्योजक नामदेव गावडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संतोष गावडे,हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य प्रमोद गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य माणिक गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस मानसिंग गावडे,सुनील गावडे, दत्तात्रय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इतर लोकोपयोगी कामे यासाठी पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती, पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण यांच्याकडून जास्तीत जास्त निधी मिळवून विकास साधन असल्याचे सरपंच सीमा नामदेव गावडे यांनी सांगितले. सरपंच उपसरपंच निवडीबद्दल पंचक्रोशीतील नागरिकांकडून दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.