नायपितॉ – “मोचा’चक्रिवादळामुळे म्यानमारमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या 81 वर पोचली आहे. स्थानिक नेते, अधिकारी आणि म्यानमारच्या सरकारी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. रखाईन प्रांतातील बू मा आणि जवळपासच्या खाउंग डोके कार या गावांमध्ये किमान 46 जणांचा मृत्यू झाला आहे. याच गावांमधील रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारच्या लष्कराने हुसकावून लावले होते.
रखाईन प्रांताची राजधानी सितवेपासून जवळच्या राथेडंगमध्ये एका मठाचे छत कोसळून किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेजारच्या एका गावात इमारत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे, असे सरकारी माध्यमाने म्हटले आहे.
मोचा चक्रिवादळ रविवारी जमिनीवर आले होते. ताशी 195 किलोमीटर वेगाने वारे वहात असल्यामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळले आहेत. मासेमारीच्या बोटी देखील उलटून पडल्या आहेत. सितवे जवळच्या दपाईंग येथील रोहिंग्यांच्या छावणीतील 9 जण बेपत्ता झाले आहेत. येथील पूल वादळामुळे उद्ध्वस्त झाल्यामुळे चावणीतील लोक छावणीबाहेर येऊ शकत नसल्याचे स्थानिकअधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी 5 जणांच्या मृत्यूची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र त्याचे कोणतेही तपशील देण्यात आले नव्हते. मोचा हे म्यानमारला धडकलेले गेल्या दशकभरातील सर्वात भीषण वादळ होते.