Cyclone Michaung : तामिळनाडूमध्ये मिचॉन्ग चक्रीवादलामुळे हाहाकार माजला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच राज्य सरकारने चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्राकडे आर्थिक मदत मागितली आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्राकडे 5,060 कोटी रुपयांच्या अंतरिम मदतीची मागणी केली आहे. एकूण नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे, ज्याचा अहवाल तयार केला जाईल आणि केंद्राकडे अतिरिक्त रकमेची मागणी केली जाईल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले.
तामिळनाडू सरकारने अधिकृत पत्रक जारी करून,’एकूण नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर सविस्तर अहवाल तयार करून अतिरिक्त निधीची मागणी केली जाईल. असे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 5,060 कोटी रुपयांची अंतरिम मदत देण्याची मागणी केली आहे. हे पत्र द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) खासदार टीआर बालू पंतप्रधानांना सुपूर्द करतील.
एमके स्टॅलिन यांनी पत्रात चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपेट या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील दिला आहे. प्रसिद्धीनुसार, ‘चक्रीवादळामुळे चेन्नई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील भागात प्रचंड नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, सार्वजनिक इमारती यांसारख्या पायाभूत सुविधांचे बरेच नुकसान झाले आहे. वादळामुळे लाखो लोकांच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे.